मुंबई - काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात चव्हाण यांनी भाजप सदस्यत्वाचा फॉर्म भरला. चव्हाण समर्थकांनी गर्दी केली होती. मंत्री गिरीश महाजन, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, खा. प्रताप पाटील-चिखलीकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. माजी आमदार अमर राजूरकर यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
...अन् रात्री २ वाजता कॉलअशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी सांगितले की, चव्हाण यांनी मंगळवारीच भाजप प्रवेश घ्यावा, असे सोमवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीहून कळविण्यात आले. बावनकुळे यांनी लगेच चव्हाण यांना कॉल करून ही माहिती दिली.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष...आशिष शेलार यांचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा करताच हशा पिकला.
मी बिनशर्त भाजपमध्ये गेलो आहे. राज्य, माझा जिल्हा यांच्या विकासासाठी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये गेलो आहे. पक्षादेश, फडणवीस सांगतील त्याप्रमाणे मी काम करीन.- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
अशोकरावांचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांना अत्यंत सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल. ज्येष्ठ नेते काँग्रेसला सांभाळता येत नाहीत. काँग्रेस दिशाहीन झाली असून, त्यांनी आत्मचिंतन करावे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री