मुंबई - केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दिली. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला निर्भेळ यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजीव गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने सर्वस्व पणाला लावले होते. तसेच शिवसेनाही मैदानात होती. मात्र या सर्वांवर मात करत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला. 81 सदस्य असलेल्या महानगर पालिकेत काँग्रेसचे 70 हून अधिक सदस्य निवडून आले. या यशावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, "नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत नांदेडकरांनी भाजपाच्या खोट्या प्रचाराला धुडकावले. जनतेने काँग्रेसच्या कामांवर विश्वास दर्शवला. आज मिळवलेल्या विजयामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वाटाही मोठा आहे."यावेळी भाजपाने निवडणुकीपूर्वी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचाही समाचार घेतला. "नांदेडमध्ये भाजपाने फोडाफोडीचे राजकारण केले. भाजपावाल्यांनी काँग्रेसचे सहा नगरसेवक फोडले. मात्र आज लागलेल्या निकालांमध्ये हे सर्व नगरसेवक पराभूत झाले आहेत. भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी नाकारले आहे. तसेच केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. नांदेड आणि त्याआधी परभणी, मालेगाव, भिवंडी आदी महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालांमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली झाली." यावेळी पेट्रोलची दरवाढ, महागाई, जीएसटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्यांवरूनही अशोक चव्हाण यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले. नांदेड महानगपालिकेच्या निवडणुकीनंतर अभिनंदन करणाऱ्या नारायण राणेंचे अशोक चव्हाण यांनी आभार मानले. मात्र राणेंनी भाजपा नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचा धागा पकडत चव्हाण यांनी याचा विचार भाजपा नेत्यांनी केला पाहिजे, असा चिमटा काढला. नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर एनडीएचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेसह भाजपावर प्रहार केला होता. उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी भाजपा नेत्यांवरही निशाणा साधला होता. त्याआधी काँग्रेसने निकालांमध्ये आघाडी घेतल्यावर नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली होती. नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांचे आभार मानले. तसेच भाजपावर सडेतोड टीकाही केली. नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
भाजपाचा परतीचा प्रवास सुरू, नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 5:33 PM