कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत २१ सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू. अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका समर्थ विकास पॅनेलद्वारे लढवू, असे ते म्हणाले.राणे यांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. जिल्ह्यातील नगरपालिकेपासून जिल्हा बँकेपर्यंत सर्व सत्तास्थाने काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्याचे फळ कार्यकारिणी बरखास्त करून अशोक चव्हाण यांनी दिले, असे ते म्हणाले. कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणे सिंधुदुर्ग दौ-यावर आले. त्यांच्या समर्थकांनी गोवा ते कुडाळ रॅली काढली. सभेला त्यांचे दोन्ही पुत्र, माजी जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते हजर होते.> भाजपामध्ये जाणार की पक्ष काढणार?राणे यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. घटस्थापनेदिवशी ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. पण तो निर्णय काँग्रेस सोडण्याचा, भाजपात जाण्याचा की, नवा पक्ष काढण्याचा असेल? याविषयी उत्सुकता आहे. राणे यांचा तूर्त भाजपाप्रवेश होणार नाही. दिवाळीपर्यंत ते ‘बाहेर’ राहून काँग्रेसमधून कोण-कोण सोबत येतात, याची चाचपणी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.>३१ जिल्हे पाठीशीघटस्थापनेदिवशी मी माझा निर्णय जाहीर करणार, त्या वेळी कोण कोणाला धक्का देतो ते पाहू. महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कोकणी जनतेच्या भल्यासाठी मी आणि माझे दोन्ही पुत्र राजकारणात आहोत. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी आहेत, असा दावाही राणे यांनी केला.
नारायण राणेंची गुरुवारी ‘गटस्थापना’?, अशोक चव्हाणांवर जोरदार टीका, पत्ते मात्र उघड केलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 6:08 AM