उस्मानाबाद- 'उस्मानाबादमधील काँग्रेस पक्षाने पूर्णपणे विश्वासघात केला. आघाडीचा धर्म न पाळता एका बाजून मतदान केलं', अशी घणाघातील टीका लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांनी दिली आहे. काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही पण राष्ट्रवादीने मला जिंकविण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती, असंही अशोक जगदाळे यांनी म्हटलं.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील द्वंद्वामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत मंगळवारी भाजपाने बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस विजयी झाले.तर अशोक जगदाळे यांचा पराभव झाला. अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी झालेला पराभव धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे. तर दुसरीकडे या विजयामुळे पंकजा यांची भाजपातील पत आणखी वाढली आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है', असे विधान करत धनंजय यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.