घोडेगाव : शाळा सुरू होऊन दोन महिने झाले, तरी आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेला अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने मुलांना पोटभर जेवणही मिळत नसल्याचे भयानक वास्तव आश्रमशाळेत दिसत आहे. राज्यातील आश्रमशाळा विविध समस्यांनी ग्रासलेल्या असताना या वर्षी आदिवासी विभागाने नवीन समस्या निर्माण करून ठेवली आहे. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाकडून निश्चित झाली नसल्याने मुलांना धान्य, भाज्या, फळे यांचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे सध्या मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. पोटभर जेवण मिळेनासे झाले आहे. मुलांना वरणभात, पिठलंभात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. सध्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर मुख्याध्यापकांना किरकोळ खरेदीचे अधिकारी देऊन आश्रमशाळा सुरू ठेवल्या आहेत. मुख्याध्यापकही बाजारातून ५ किलो बेसनपीठ, १० किलो तांदूळ अशा स्वरूपात साहित्य आणून मुलांना जेवण देत आहेत. पालेभाज्या, फळे तर शाळा सुरू झाल्यापासून मुलांना मिळालेलीच नाहीत. आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आज मुलांना अपुरे जेवण मिळत आहे. यापूर्वी आदिवासी आयुक्त कार्यालयात निविदाप्रक्रिया होत होती; मात्र तेथील प्रक्रियेबाबत तक्रारी व गोंधळ झाल्याने अप्पर आयुक्त कार्यालयात निविदा प्रक्रिया ठेवण्यात आली. पण, येथेही ठेकेदारांमधील स्पर्धेतून आपापसात झालेल्या तक्रारी, आदिवासी कार्यालयाच्या काही त्रुटी, त्यातून ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही प्रक्रिया पूर्ण अडचणीत आली. त्यामुळे ठेकेदारांनी निविदा सादर करूनही अप्पर आयुक्त त्या निश्चित करू शकलेले नाहीत. आंबेगाव तालुक्यातील आश्रमशाळांत निर्माण झालेल्या अडचणीबाबत पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, माजी सभापती कैलासबुवा काळे, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, पिंपरगणेचे सरपंच भीमा गवारी यांनी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांची भेट घेतली. (वार्ताहर)>या वेळी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी सांगितले, की आदिवासी आयुक्त कार्यालयांतर्गत सुरू असलेलया निविदाप्रक्रियेतील अडचणींमुळे अन्नधान्य पुरवठा करण्याच्या निविदा रखडल्या आहेत. सध्या सात-सात दिवसांचे साहित्य खरेदी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. आसाणे, आहुपे शाळेतील मुख्याध्यापकांनी अहवाल व्यवस्थित दिले नसल्याने येथे कडधान्ये, भाजीपाला कमी पडला होता. मात्र, त्यांना खरेदीचे पूर्ण अधिकार दिले असून, दि. १५ आॅगस्टपर्यंची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आश्रमशाळांना अन्नधान्य कमी पडू नये, याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहेत, असे ते म्हणाले. >आसाणे, आहुपे आश्रमशाळांत मुलांना पिठलंभात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. तसेच, त्यांना जेवणात गेले अनेक दिवस चपाती मिळालेली नाही. आश्रमशाळांत भाजीपाला नाही, डाळी- कडधान्येही संपली आहेत, अशा तक्रारी मांडल्या.>शालेय साहित्यवाटपाच्या निविदाप्रक्रियेतही गोंधळ झाल्याने मागील वर्षापासून शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे अजूनही मुलांना बूट, गणवेश, वह्या, पुस्तके शासन देऊ शकलेले नाही.
आश्रमशाळेत मिळेना पोटभर जेवण
By admin | Published: August 06, 2016 12:44 AM