ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.10 - पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या ११ आरोपींना खामगाव न्यायालयाने गुरूवारी १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर अन्य चार आरोपीही न्यायालयीन कोठडीत असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
तालुक्यातील पाळा येथील स्व.निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगीक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत विद्यार्थीनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी १७ आरोपींविरूध्द गुन्हे दाखल करून यामधील १५ जणांना अटक केली आहे. दरम्यान ४ नोव्हेंबर रोजी इत्तुसिंग कानुसिंग पवार, डिगांबर राजाराम खरात, स्वप्नील बापुराव लाखे, नारायण दत्तात्रय अंभोरे, दिपक अण्णा कोकरे, ललिता जगन्नाथ वजीरे, मंदाबाई अण्णा कोकरे, शेवंताबाई अर्जुन राऊत, गजानन निंबाजी कोकरे, संजय अण्णा कोकरे, पुरूषोत्तम गंगाराम कोकरे या ११ आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. गुरूवारी या ११ आरोपींना पुन्हा न्यायालयात पोलिसांनी १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून ११ ही आरोपींना येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान गुरूवारी ११ आरोपींना अपराध नं.२०१/१६ अन्वये न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर दुसºया पिडीत विद्यार्थीनीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध नं.२०२/१६ अन्वये विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी पुन्हा या ११ आरोपींना न्यायालयात सादर करून पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती आहे.
चार आरोपींच्या जामीन अर्जावर १५ नोव्हेंबरला सुनावणी
पाळा येथील आश्रम शाळेत अत्याचार प्रकरणातील १३ सह आणखी ४ जणावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. पोलिसांनी बाळकृष्ण धराज वाघे, अनिल राघोजी कोकरे, साहेबराव रामा कोकरे, मोहन राजाराम कोकरे या चार आरोपींना ५ नोव्हेंबरला अटक करून खामगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान या चारही आरोपींच्या जामीन अर्जावर गुरूवार १० नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र ही सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दोन आरोपी अद्यापही फरार
अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरणात एकुण १७ आरोपींविरूध्द गुन्हे दाखल होवून १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र यामधील मुख्याध्यापक भरत विश्वास लाहुडकर व विजय रामुजी कोकरे हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.