ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलिवूडमध्ये मराठी झेंडा रोवणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" ठरले आहेत. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उषा काकडे, गजेंद्र चौहान यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
चित्रपट (पुरुष) विभागात आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत राजेश म्हापूसकर, जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी, समीर पाटील आणि सैराट फेम आकाश ठोसर यांचाही नामांकन यादीत समावेश होता. मात्र आशुतोष गोवारीकर यांनी बाजी मारली आहे. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे.
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
आशुतोष गोवारीकर यांचा प्रवास -
ब-याच वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात परतणा-या आशुतोष गोवारीकर यांनी "व्हेंटिलेटर" या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. दिग्दर्शक म्हणून आशुतोषने बॉलीवूडमध्ये आपली एक खास जागा निर्माण केली आहे. "व्हेंटिलेटर" या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांच्यातील अभिनेता अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. आशुतोषने यांनी त्यांच्या कारकिदीर्ची सुरुवात एक अभिनेता म्हणूनच केली होती. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले, पण दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर त्याला अभिनयासाठी तितकासा वेळ देता आला नाही. ती उणीव "व्हेंटिलेटर" चित्रपटाद्वारे भरून काढताना, आपण प्रतिभाशाली दिग्दर्शक असण्यासोबतच चतुरस्त्र अभिनेता असल्याचे त्याने अधोरेखित केले. "व्हेंटिलेटर" या चित्रपटात आशुतोष गोवारीकरने एका दिग्दर्शकाचीच व्यक्तिरेखा साकारली आहे. बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक असलेला राजा आपल्या काकांना पाहायला रुग्णालयात येतो आणि अनेक वर्षांनंतर त्याची आपल्या नातेवाईकांशी भेट होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या गजूकाकांचा तो अतिशय समंजस पुतण्या आहे. गजूकाकांना व्हेंटिलेटलवर ठेवावे अथवा नाही, याबाबत त्यांच्या कुटुंबात चांगलेच मतभेद असतात, पण हा अवघड प्रसंग निभावून नेण्याची जबाबदारी राज या व्यक्तिरेखेच्या खांद्यावर आहे आणि ही जबाबदारी आशुतोषने समर्थपणे पेलली आहे. चित्रपटात तो अभिनय करतोय, असे कुठेच जाणवत नाही. चित्रपट दिग्दर्शकाची व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी रिअल लाइफचे चांदणे पसरवत त्यांचे कमबॅक साजरे केले आहे. या भूमिकेत तो प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिला आहे. या चित्रपटातील अनेक कलाकारांमध्ये आशुतोषचा अभिनय उजवा ठरला.
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा