कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी महेश फळणीकरला अलिबाग न्यायालयात हजर करणाऱ्या पोलिसांच्या पथकाकडून सरबराई करण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पथकातील एका सहायक फौजदाराला निलंबित केले. तर पोलीस शिपाईला शोकॉज नोटीस बजावली.संशयित फळणीकरला मैत्रिणीसोबत जेवण आणि गप्पा मारण्यासाठी सवलत देण्यात आली होती. निलंबित अधिकाऱ्यांसह शिपाई यांची नावे सांगण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत.बिद्रे यांच्या खुनाचा उलगडा फळणीकरने केला आहे. त्याला मंगळवारी (दि. ८) अलिबाग न्यायालयात हजर केले होते. यावेळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी त्याला मैत्रिणीसोबत जेवणाची सोय, गप्पा मारण्यासाठी खास मुभा दिली होती. याची व्हिडीओ क्लिप बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली होती. ती सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पारसर यांनी ही कारवाई केली.