कोल्हापूर : जिद्द, अभ्यासातील सातत्याच्या जोरावर आणि संसार सांभाळत अश्विनी जाधव-डवरी यांनी ‘पीएसआय’परीक्षेतील यशाला गवसणी घातली आहे. त्यांचे यश नवोदित विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रेरणादायी ठरणारे आहे. विवाहानंतरच्या संसारिक जबाबदाऱ्या पेलत हे यश मिळवल्याने सर्वस्तरावरुन अश्विनी जाधव यांचे कौतुक करण्यात येत आहे.
अश्विनी जाधव यांचे मूळ गाव रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) आहे. याच ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण, तर माध्यमिक शिक्षण इस्लामपूरमध्ये झाले. तसेच त्यांनी मालती वसंतदादा पाटील महाविद्यालयातून बी. ए. (इतिहास)ची पदवी घेतली. त्यांचा सन २०१२ मध्ये नवनाथ वाटकर यांच्याशी विवाह झाला. मात्र विवाहानंतर देखील अश्विनी यांनी संसार सांभाळत जिद्द आणि मेहनत पणाला लावली.
पती वाटकर यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर अभ्यासात चार वर्षांचा खंड पडला होता. मात्र मुलीच्या जन्मानंतर सन २०१६ला अश्विनी यांनी पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
अश्विनी यांना पहिल्यांदा मुख्य परीक्षेत यश संपादन करण्यात अपयश आले. मात्र तरीदेखील जिद्द न हारत त्यांनी पुन्हा तयारी केली. दुसऱ्या प्रयत्नात अश्विनी जाधव यांच्या मेहतीला यश मिळाले आणि पीएसआय परीक्षेत बाजी मारत यश संपादन केले.
माझे पती खासगी नोकरी करतात. वडील रामदास जाधव हे तांबट व्यावसायिक, तर आई अलका या शेतमजूर आहेत. संसार सांभाळून या परीक्षेत यशस्वी झाल्याचा खूप आनंद होत आहे. या पदावर मी रुजू होणार असल्याचे अश्विनी यांनी सांगितले.