ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ - कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या अश्विनी रामाणे यांची निवड झाली आहे. रामाणे यांनी भाजपाच्या सविता भालकर यांचा ११ मतांनी पराभव केला आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला २७, राष्ट्रवादीला १५, ताराराणीला १९, भाजपला १३, शिवसेनेला चार जागा मिळाल्या, तर तीन जागांवर अपक्षांना संधी मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादीचा आघाडी झाल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल असे चित्र होते. पण ऐनवेळी भाजपा - ताराराणी आघाडीनेही महापौैरपदासाठी अर्ज सादर केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. निवडणुकीत चमत्कार घडेल असे सूचक वक्तव्य भाजपा नेत्यांकडून केले जात होते. यापार्श्वभूमीवर सकाळी महापौरपदाची निवडणूक पार पडली.
काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांना ४४ तर भाजपाच्या सविता भालकर यांना ३३ मतं मिळाली. शिवसेनेचे चारही नगरसेवक निवडणुकीच्या वेळी सभागृहात गैरहजर होते. निवडणूक पार पडताच सेनेचे नगरसेवक सभागृहात आले. शिवसेनेने तटस्थ राहून अप्रत्यक्षपणे आघाडीला साथ दिल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.