कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अश्विनी अमर रामाणे, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला या ४४ विरुद्ध ३३ मतांनी विजयी झाल्या. महापौर निवडणुकीत भाजपाच्या सविता भालकर यांचा, तर उपमहापौर निवडणुकीत ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या चार सदस्यांनी तटस्थ राहून भाजपाला धक्का दिला.काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन भाजपा, तसेच आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीस सत्तेपासून रोखले. महापालिकेच्या निवडणुकीत एकूण ८१ पैकी काँग्रेसला २७, राष्ट्रवादीला १५, ताराराणी आघाडीस १९, भाजपला १३, शिवसेनेला चार जागा मिळाल्या. तिघे अपक्ष निवडून आले होते. त्यापैकी दोघा अपक्षांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला होता.काँग्रेसचा महापौर होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही यश येत नाही म्हटल्यावर, भाजपाने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सोडून दिले, अन्यथा राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीने एकत्र येऊन महापौर करावा व त्यास भाजपाने पाठिंबा द्यायचा, असा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न होता. मात्र, राष्ट्रवादीने ताराराणी आघाडीस पाठिंबा देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी) महापौर बनलेल्या अश्विनी रामाणे या पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत, तर शमा मुल्ला या सामान्य शेतकरी कुटुंबातील असून, त्यांच्या रूपाने महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम महिलेस उपमहापौरपदाची संधी मिळाली.शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेला सोबत येण्यासाठी आवाहन करून आटोकाट प्रयत्न केले होते. परंतु याबाबत कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ७२ तासांपूर्वी आपण विरोधी बाकावर बसण्याचे जाहीर केले होते.- चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री
महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे
By admin | Published: November 17, 2015 1:18 AM