मुंबई : राज्यातील डझनभर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. विरोधकांनी पुराव्यानिशी मंत्र्यांवर आरोप केले आहेत. गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे या सर्व मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंडप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जो नियम लावला, तो अन्य भ्रष्ट मंत्र्यांना का लावला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. विविध विभागातील घोटाळ्यांच्या मुद्यावर विरोधकांनी नियम २६० अन्वये चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला सुरुवात करताना मुंडे म्हणाले की, न खाऊंगा, न खाने दुँगा असे म्हणत सत्तेवर आलेल्यांच्या घोटाळ्यांवर प्रत्येक अधिवेशनात बोलावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. चिक्की घोटाळ्यात वर्षभरापूर्वी पुरावे दिले, सातत्याने पत्रव्यवहार करुनही चौकशी करणे तर दूरच, पत्राची साधी पोच देण्याचे सौजन्यही सरकारने दाखवले नाही. कारवाई न करता क्लिनचिट दिली जात असेल तर, समिती तरी कशाला नेमली ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘नमामी चंद्रभागा’ या योजनेसारखी मंत्रिमंडळाला शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन शुद्धीकरणाची मोहिम हाती घ्यावी, असा चिमटाही मुंडे यांनी काढला. केंद्र सरकारने फटकारले, तरी शालेय शिक्षण विभागातील खरेदीची चौकशी करण्यात आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागातील २९७ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे कोणता थांगपत्ताच नाही. तर डाळ घोटाळ्याचे कवित्व यावषीही सुरु असून बाजारात ९० रुपये किलोने मिळत असलेली डाळ रेशन दुकानावर १२० रुपये किलोने विकण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, असा सवाल मुंडे यांनी केला. आदिवासी विभागात दर अधिवेशनाला नवीन घोटाळा समोर येत आहे, असे मुंडे म्हणाले.>भ्रष्ट मंत्री लगे रहो!मुख्यमंत्र्यांनी कालच सभागृहात एकाही मंत्र्यांवर कारवाई करणार नाही, असे वक्तव्य करुन भ्रष्ट मंत्र्यांना लगे रहोचा संदेश दिला आहे. सरकारमध्ये सहभागी असणारे शिवसेनेचे मंत्रीही भ्रष्टाचारात मागे नाहीत. मराठी माणसाचे नाव घेत मराठी माणसाला देशोधडीला लावले आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर हे स्वत: एसआरएचा भ्रष्टाचार आणि आरे येथे बेकायदेशीररित्या जमीन बळकावल्याच्या आरोपात गुंतले आहेत. एसआरए हे आता भ्रष्टाचाराचे दुकान नव्हे तर मॉल बनले आहे. मंत्रीच जर कॉन्ट्रॅक्टर झाले तर जनतेने कुणाकडे पाहावे, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
एसीबीमार्फत भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा
By admin | Published: July 22, 2016 4:13 AM