मुंबई : दुष्काळामुळे राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने मराठवाडा व अन्य काही ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालायने दुष्काळग्रस्त भागातील रुग्णालये व शाळांमध्ये पाण्याची काय व्यवस्था केली आहे? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत याबाबत संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश बुधवारी दिला.शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. मराठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. पाण्याच्या टंचाईमुळे रुग्णालयांतील शस्त्रक्रियांवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत सरकारकडे काय अॅक्शन प्लॅन आहे? पाण्याचे टँकर संबंधित जिल्ह्यांना पुरवले जातात का? तसेच शाळा आणि रुग्णालयांना पाण्याचे टँकर पुरवले जातात का? पाण्याची काय व्यवस्था केली आहे? अशी विचारणा करत खंडपीठाने राज्य सरकारला याबाबत तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)एकाच महिन्यात ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा?मराठवाडा सलग तिसऱ्यावर्षी दुष्काळाच्या संकटाला तोंड देत आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही पाणी नसल्याने हताश होऊन गेल्या वर्षभरात मराठवड्यातील एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.तर गेल्या एका महिन्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने याची गांभीर्याने दखल घेत एका महिन्या ८९ शेतकऱ्यांच्या ८९ आत्महत्या कशा? अशी विचारणा सरकारकडे करत यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.
पाणीप्रश्नी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
By admin | Published: February 11, 2016 1:34 AM