मुंबई : उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या राज्यभरातील नेतेमंडळींनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र शुक्रवारी मुंबईत दिसले. शरद पवार दिवसभर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होते, तर फडणवीस सागर बंगल्यावर भेटीगाठी घेत होते.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे फडणवीस यांना भेटले. कणकवलीतून त्यांचे पुत्र नितेश यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जाते, पण दुसरे पुत्र नीलेश यांना कुडाळमधून उमेदवारी देण्यासाठी राणे प्रयत्नशील आहेत. चंदगड (जि. कोल्हापूर) येथे अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत, तिथे भाजपकडून इच्छुक असलेले शिवाजी पाटील, खा. धनंजय महाडिक, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत हेही फडणवीस यांना भेटले. माजी राज्यमंत्री रणजीत पाटील हे अकोट, अकोला पूर्व आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा या तीनपैकी एक मतदारसंघ मिळावा या मागणीसाठी भेटले.
मीरा रोड मतदारसंघातून इच्छुक असलेले नरेंद्र मेहता, वर्सोवा मतदारसंघातील आमदार भारती लव्हेकर याही भेटल्या. राजेंद्र गावित हे पालघरमधून विधानसभा लढवू इच्छितात, त्यांनीही फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पिंपरी-चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनीही फडणवीस यांची भेट घेतली.
भाजप कार्यालयासमोरच राज पुरोहित यांचा ठिय्याकुलाबा मतदारसंघातील उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार राज पुरोहित यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर तीन तास समर्थकांसह धरणे दिले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र, पुरोहित समर्थकांनी त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी यावेळी घोषणाबाजी केली.