ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - सक्करद-यातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची तीन ते चार जणांनी चाकूचे सपासप घाव घालून निर्घृण हत्या केली. खंडणी वसूलीच्या वादातून ही हत्या झाली आहे. दुसरीकडे मायकेल नामक गुंडावर त्याच्या विरोधी गटातील आरोपींनी प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. केवळ एका तासाच्या अंतराने शुक्रवारी दुपारी वर्दळीच्या भागात या घटना घडल्या. त्यामुळे शहरात थरार निर्माण झाला आहे.
आशिष राऊत याच्यावर हत्या आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची सक्करदरा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दहशत होती. तो दिवसाढवळळ्या शस्त्राच्या जोरावर खंडणी वसुली करायचा. एकाच दुकानदाराला नेहमी नेहमी खंडणी मागायचा. छोटे दुकानदार त्याच्यापासून त्रस्त होते. त्यामुळे त्याला तडीपारही करण्यात आले होते. दीड महिन्यापूर्वीच तो तडीपारी संपवून शहरात परतला अन् पुन्हा त्याने भाईगिरी सुरू केली.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास कमला नेहरू महाविद्यालयाजवळच्या बाजारात तो अॅव्हेंजरने आला. सिनेमातील गुंडाप्रमाणे त्याने आपली दुचाकी उभी करून शिवीगाळ करीत हप्ता वसुली सुरू केली. त्यामुळे आधीच चिडून असलेल्या तीन ते चार जणांनी राऊतवर भाजी कापण्याचा सूरा आणि तसेच घातक शस्त्रे घेऊन हल्ला चढवला. राऊतला रक्ताच्या थारोळळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेले. दिवसाढवळळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच सक्करदरा तसेच गुन्हेशाखेचे पोलीस घटनास्थळी धावले.
सक्करद-यात राऊतच्या हत्येने थरार निर्माण केला असतानाच बाजूच्या नंदनवन - खरबी मार्गावर मायकेल नामक गुन्हेगारावर सट्टेबाजीत गुंतलेल्या गुंडांनी हल्ला चढवला. त्याला घातक शस्त्राचे घाव घालून रक्ताच्या थारोळळ्यात लोळविले. आजुबाजुची मंडळी धावल्यामुळे आरोपी पळून गेले. अत्यवस्थ अवस्थेत मायकलला रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेची माहिती कळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी घटनास्थळी प्रचंड तणाव असल्याने पोलिसांना माहिती मिंळवताना टिकेला सामोरे जावे लागले. वृत्त लिहिस्तोवर दोन्ही प्रकरणातील आरोपींची नावे स्पष्ट झालेली नव्हती.