नागपूर : ज्या विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला होत्या त्याच विभागाचे मंत्री सभागृहात गैरहजर होते. त्यामुळे विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. मंत्री सभागृहात येत नसल्याने विधानसभा दोनवेळा तहकूब करावी लागली. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सभागृहात येऊन बसले आणि त्यानंतरच पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाली.विधानसभेत मंगळवारी सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य आणि आदिवासी विभाग अशा पाच विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला होत्या. तर विधानपरिषदेत आजच तब्बल १६ विभागांच्या मागण्या चर्चेला आणल्या होत्या. त्यामुळे मंत्र्यांची पुरती दमछाक होतानाचे चित्र आज विधानभवन परिसरात होते. विधानसभेत सामाजिक न्याय विभागाची लक्षवेधी होती. त्याला उत्तर देऊन त्यांच्याच विभागाच्या पुरवणी मागण्या असतानाही मंत्री राजकुमार बडोले निघून गेले. राज्यमंत्री विद्या ठाकूर वगळता संबंधित विभागाचा एकही मंत्री सभागृहात नव्हता. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हजर होेते पण ज्यांच्या विभागाच्या मागण्या आहेत त्यांनी चर्चेला हजर रहावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.शेवटी तालिका अध्यक्ष जयप्रकाश मुंदडा यांनी १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. त्यानंतर योगेश सागर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात आले. मंत्री येतील आपण चर्चेला सुरुवात करा असे ते सांगत होते. ऊर्जामंत्री बावनकुळे देखील मी चर्चेचे मुद्दे लिहून घेण्यास तयार आहे असे म्हणत होते तरीही विरोधक आक्रमक होते. पुन्हा सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले गेले. शेवटी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री फडणवीस स्वत: सभागृहात आल्यानंतर सभागृह सुरळीत सुरू झाले. मात्र मंत्रीच नसल्याने सभागृह दोनवेळा बंद पाडण्याची नामुष्की सरकारवर आली. (प्रतिनिधी)
विधानसभा दोनदा तहकूब!
By admin | Published: December 16, 2015 3:19 AM