मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी होण्याची शक्यता आहे. जागांची तडजोड केल्यास आघाडी होऊ शकते, असं विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. माझ्या हातून काही चूक झाली असेल, तर त्यासाठी मी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागायला तयार असल्याचंदेखील ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही वंचित आणि एमआयएमची आघाडी होऊ शकते.जागावाटपात सन्मान राखला जात नसल्यानं आघाडीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. यानंतर जलील आणि वंचित बहुजन आघाडीत वाकयुद्ध रंगलं होतं. मात्र आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. जागावाटपात तडजोड झाल्यास आघाडी शक्य असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. एमआयएमला सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितसोबत आघाडी होईल, असं म्हणत त्यांनी मनोमिलनाचे संकेत दिले.प्रकाश आंबेडकर आमचे मोठे बंधू आहेत. त्यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना फोन करुन संवाद साधावा, असं म्हणत जलील यांनी आंबेडकरांची माफी मागण्याचीदेखील तयारी दर्शवली. माझ्याकडून काय चूक झाली याची मला कल्पना नाही. मात्र अनावधानानं माझ्या हातून काही चुकीचं घडलं असेल, तर त्यासाठी मी आंबेडकरांची क्षमा मागण्यास तयार आहे. कारण मी त्यांचा आदर करतो, असंदेखील जलील म्हणाले.जलील यांनी आघाडी मोडल्याची घोषणा केल्यानंतर वंचितच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे जलील आणि वंचित यांच्यात वाद पेटला होता. या वादावर भाष्य करताना आंबेडकर यांनी आम्ही थेट ओवेसींशी बोलतो, असं म्हणत जलील यांना अनुल्लेखानं मारलं होतं. विशेष म्हणजे यावर ओवेसी यांनी जलील यांचाच शब्द महाराष्ट्रात अंतिम असेल, असं म्हणत आघाडी मोडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं होतं.
Vidhan Sabha 2019 : ...तर वंचितसोबत पुन्हा आघाडी शक्य; एमआयएमचा सूर बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 6:22 PM