- मोसीन शेख
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे आकडे जवळपास स्पष्ट झाले आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या ८४५ मतांनी पराभव झाला असून, काँग्रेसचे आशुतोष काळे यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे व जिल्ह्या परिषद सदस्य राजेश परजणे यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. त्यांना १५ हजार ३८२ मते मिळाली आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या पराभवाला परजणे यांची बंडखोरी कारणीभूत ठरली असल्याची चर्चा आता पाहायला मिळत आहे.
राज्यातील काही मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातील एक म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघांचे सुद्धा नाव घेतले जात होते. परजणे यांची उमेदवारी कोल्हे यांच्या विजायाला अडथळा ठरणार असल्याचे आधीपासूनच चर्चा होती. मात्र हाती आलेल्या निकाल पाहता हा अंदाज खरा ठरला आहे. परजणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विखे कुटंबाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विशेष म्हणजे खुद्द राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे सांगितले असल्याचे बोलले जात होते. मात्र शेवटपर्यंत परजणे आपल्या निर्णयावर ठाम राहत, त्यांनी निवडणूक लढवली.
हाती आलेल्या निकालानुसार कोल्हे यांना 86 हजार ७१४ मते मिळाली आहेत, तर काळे यांना ८७ हजार ५८९ मते मिळाली असून त्यांचा अवघ्या ८४५ मतांनी विजय झाला आहे. तर विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांना १५ हजार ३८२ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे परजणे यांनी जर माघार घेतली असती तर त्यांची मते भाजपला मिळाली असती व कोल्हे यांचा सहज विजय झाला असता. त्यामुळे कोल्हे यांना परजणेंच्या बंडखोरिचा फटका बसला असून, त्यांच्या पराभवाला विखे यांचे मेहुणे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेली मते
आशुतोष काळे (काँग्रेस) - ८७ हजार ५८९स्नेहलता कोल्हे (भाजप) - 86 हजार ७१४राजेश परजणे (अपक्ष) - १५ हजार ३८२विजय वहाडणे (अपक्ष) - ०३ हजार ४३२