मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रकिया सोमवारी पार पडली. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान करण्यात आले. मात्र आता संपूर्ण राज्याचे लक्ष गुरवारी ( ता.24 ) रोजीच्या निकालाकडे लागले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील चावडी आणि पारावर सुद्धा आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येणार याची चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागातून मतदानाचा उत्साहा हा जास्त पहावयास मिळाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये निकाला बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या मतदान केंद्रावर किंवा गावात किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी येताच आकड्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.
ग्रामीण भागात निकाला विषयी गावातील कट्यावर,पारावर आणि चावडीवर आपल्या मतदारसंघातून नेमके कोण निवडणून येणार याची चर्चा रंगत आहे. कुठे परिवर्तनाच्या तर कुठे विकासाच्या नावाने गप्पा रंगत आहे. तर काही ठिकाणी मतदारसंघातील जातीचे समीकरणांची आकडेमोड सुरु झाली आहे. तर गावा-गावातील झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची आकड्यांचा अंदाज बांधला जात आहे.
सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच विजय होईल अशी खात्री वाटत आहे. तर काही ठिकाणी विजयाच्या जल्लोषाची तयारी सुद्धा करण्यात येत आहे. परंतु कोण ठरणार किंगमेकर हे निकालानंतर ठरणार आहे. मात्र असे असले तरीही विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल लागेपर्यंत कार्यकर्त्यांमधील दावे-प्रतिदावे सुरुचं राहणार.