मुंबई : केंद्रात ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव आणि महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळातील ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून आमने-सामने पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे दानवे यांचे जावई जाधव हे २ वेळा या मतदारसंघातून निवडणून आले आहेत. त्यामुळे दानवेंचे जावईबापू लोणीकरांच्या जावयाला भारी ठरणार का ? अशी चर्चा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वच राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र असे असताना काही मतदारसंघातील निकाल चर्चेचा विषय ठरणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघ ही त्यातील एक असणार आहे. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघातून भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचे जावई आमने-सामने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे पाहायला मिळाले होते.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई यांनी कन्नड मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अपक्ष मैदानात उतरले होते. किशोर पवार हे भाजपाचे हतनुर जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढवली. तर हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवली.
कन्नड मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव सलग दोन वेळा आमदार राहिले आहेत. तर शेवटच्या टप्प्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण फिरले आणि याचा त्यांना लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. तर लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी तालुक्यातील नात्यागोत्याचं घट्ट जाळ आणि मंत्री लोणीकर यांच्या माध्यमातून तालुक्यात केलेली कामे या जोरावर निवडणूक लढवली. त्यामुळे भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या जावयांपैकी कुणाला विजय मिळणार हे गुरवाराच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.