मुंबई - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर विरोधीपक्ष आता अंगात आवसान आणून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने एकूण २२९ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तर आघाडीने दुप्पट जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे समजते.
२०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सर्वच पक्षांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला या लाटेचा फायदा झाला. कधी नव्हे ते भाजपला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच पाच वर्षे यशस्वीरित्या चालवले. गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यात सर्वाधिक १२२ जागा भाजपला मिळाल्या होत्या. तर शिवसेनाल ६३ जागा मिळाल्या होत्या.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३०३ जागा मिळावल्या. तसेच स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवली. तर भाजप प्रणीत एनडीएला एकूण ३५० हून अधिक जागा मिळाल्या. या विजयानुसार भाजपने राज्यात देखील खडतर लक्ष्य समोर ठेवले आहे. विधानसभेला युतीने २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले. त्यानुसार भाजप आणि शिवसेना राज्यभर दौरे करत आहे.
दरम्यान विरोधक देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या ३० तारखेपर्यंत जागावाटप होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात रणनिती आखली असून विधानसभेला आघाडीने १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ८२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आघाडीने दुप्पट अर्थात १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.