औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचे विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे कळकळीचे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असे काही करू नका. केवळ ३० टक्के मतांवर भाजपचे सरकार आलेले आहे. उर्वरित ७० टक्के मते आता एकसंध राहिली पाहिजेत.मतांचे विभाजन टाळावे यासाठीच मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकदा नव्हे, तर पाच वेळा गेलो. तशी जागावाटपाचीही फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनावेत, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, काँग्रेस आरएसएसच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची आरएसएसविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची आरएसएसच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचे कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह आरएसएसविरोधी सर्व शक्तींनी एकत्र येत लढा उभा करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्टÑवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे, असेही त्यांनी सांगितले.घोषवाक्याला उस्फुर्त प्रतिसादअबकी बार बस कर यार, अबकी बार काँग्रेस सरकार, अबकी बार आपटी मार, असे घोषवाक्य अशोकराव चव्हाण सादर करीत होते, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. लोकांना पाहिजेत चारा छावण्या आणि यांनी सुरू केल्या डान्सबार लावण्या या त्यांच्या वाक्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठा आरक्षण ही काही सरकारची मेहरबानी नाही. त्यासाठी सकल मराठा समाजाला दबाव निर्माण करावा लागला. ५८ मोर्चे काढावे लागले; पण लागू झाले का मराठा आरक्षण? असा सवालही त्यांनी केला.
‘लोकसभेसोबतच राज्यात विधानसभेची निवडणूक’ - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 5:11 AM