विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:45 AM2019-08-27T06:45:11+5:302019-08-27T06:46:34+5:30

जागावाटपावरून मात्र युतीमध्ये मतभेद अटळ

Assembly elections announced three weeks later; Voting is possible in one phase | विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य

विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य

Next

हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांत करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने शिष्टमंडळ महाराष्ट्रात येईल आणि परिस्थितीची पाहणी करेल. महाराष्ट्रात एका टप्प्यातच सर्व मतदारसंघांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.


निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, २२ आॅक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान ३१ दिवस आवश्यक असल्याने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागू होईल. राज्यात निवडणुकांसाठी सारेच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, त्यांच्या आता जनसंपर्क यात्राही सुरू आहेत. शिवसेनेने तर भाजपकडून अधिकाधिक जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभेच्या २८८ पैकी निम्म्या जागा आपल्याला मिळाव्यात, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यावर २0१४ साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा आताही त्याच पक्षाकडे राहतील आणि उर्वरित जागांचे समान वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


गेल्या वेळी भाजपने १२२ व शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच १८५ जागांबाबत कोणताही वाद होणार नाही आणि उरलेल्या १0३ जागांवरच चर्चा होईल. त्यातील काही जागा लहान पक्षांना द्याव्याच लागतील. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला ११0 ते ११५ पेक्षा अधिक जागा येऊ च शकणार नाहीत.


लोकसभेच्या वेळी मित्रपक्ष टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यांमधील जागावाटपातही लक्ष घातले होते. त्यामुळे रालोआला धक्का बसला नाही आणि भाजपलाही स्पष्ट बहुमत मिळाले. पण त्यावेळी मित्रपक्षांना बºयाच जागा सोडण्याची पाळी भाजपवर आली होती. पण विधानसभेच्या जागावाटपामध्ये भाजपचे केंद्रीय नेते सहभागी होणार नाहीत. भाजपच्या राज्य नेतृत्वानेच काय तो निर्णय घ्यावा, असे दिल्लीतील नेत्यांचे म्हणणे आहे.


मिळून ठरवणार फॉर्म्युला
जागावाटप कसे करायचे, हे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनीच ठरवावे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या महिन्यातच ‘लोकमत’ला सांगितले होते. पण शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अधिकाधिक जागांसाठी प्रयत्न आहे. पुढील मुख्यमंत्री ठरवण्यात सेनेची निर्णायक भूमिका असावी, अशी त्यांची इच्छा आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला आपण, फडणवीस व अमित शहा मिळून ठरवू, असे उद्धव यांनी म्हटले आहे.

Web Title: Assembly elections announced three weeks later; Voting is possible in one phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.