मुंबई - आगामी विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून २ टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडेल. मेरिट आणि विजयाची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल हा महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीतील जागावाटप येत्या ८ ते १० दिवसांत अंतिम होईल. अद्याप निवडणुकीच्या तारखांची घोषणा आयोगाने केली नाही. कदाचित नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात २ टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडेल. विजयाची क्षमता आणि चांगला स्ट्राईक रेट यावरच तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप होईल. आमच्या महायुती सरकारला महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. जवळपास १.६ कोटी महिलांना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अर्थसहाय्य मिळत असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आम्हाला २.५ कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहचवायचा आहे. आमचं सरकार हे सर्वसामान्यांसाठी आहे. महायुती सरकार राज्यात विकास आणि लोककल्याणकारी योजना यात समतोल साधत आहे. आमच्या सरकारचं मुंबईला झोपडपट्टीमुक्त बनवून सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचं उद्दिष्टे आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महायुती असो वा महाविकास आघाडीत यांच्यात जागावाटप अद्याप निश्चित झालं नाही. माहितीनुसार, भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत १४०-१५० जागा लढवण्याची तयारी करत आहे तर शिंदेंच्या शिवसेनेने स्ट्राईक रेटचा हवाला देत १०० हून अधिक जागा मागितल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ६० हून अधिक जागा लढवणार असल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर महाविकास आघाडीने येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
१० लाख युवकांना रोजगार देणार - मुख्यमंत्री
कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून राज्यातील दीड लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या युवकांना ६ ते १० हजारांपर्यंत स्टायपेंड दिली जाते. यात १० लाख युवकांचा समावेश करण्याचं आमचं लक्ष्य आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.