मुंबई : ज्याचे जादा आमदार, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून आणण्यावर भर दिला पाहिजे. लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल. राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटला.
शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. नवीन चेहऱ्यांना संधी तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले जिल्हा व तालुकाध्यक्ष बदल करण्याची सूचना अनेक नेत्यांनी केली. याशिवाय निवडणुका मविआच्या माध्यमातून लढण्याबाबत एकमत झाले.
आघाडी भक्कम कर्नाटकसारखीच परिस्थिती महाराष्ट्रातही असून आपण एकत्र राहिले पाहिजे, महाविकास आघाडी भक्कम ठेवायची आहे, अशी सूचना शरद पवार यांनी केली.
लवकरच फेरबदल - राष्ट्रवादीत फेरबदल केले जाणार आहेत. पक्षातील संघटनात्मक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर यांची; तर मुंबई विभागीय पक्ष निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. - नागपूर बूथप्रमुखपदी अनिल देशमुख, तर सहप्रमुख म्हणून मनोहर चंद्रिकापुरे यांची निवड करण्यात आली.