मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवामुळे राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. गुरूवारी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका साधारणपणे 15-20 ऑक्टोबरच्या दरम्यान पार पडतील. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल असं बोललं जात होतं. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 14 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत असल्याने त्याआधीच निवडणुकीची घोषणा करण्यात येईल असंही सांगितलं जात आहे.
शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं गणित अद्यापही जुळालेलं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली जात आहे तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. 14 सप्टेंबरपासून या यात्रांचा तिसरा टप्पा सुरू होईल. तर आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाकडून विविध विकासकामांच्या उद्धाटनांचा धडाका लावण्यात आला आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली यात युतीबाबत आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत चर्चादेखील केली अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मंगळवारी रात्री झालेल्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. जवळपास एक तास मुख्यमंत्री मातोश्री होते. जागावाटप आणि आगामी निवडणुकीची रणनीती या चर्चेत ठरवण्यात आली. युतीतील जागावाटपाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुचविलेला फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाकरे यांना सांगितला.
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटही झाली आहे. राज्यातील दोन्ही पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यात दोन्ही पक्ष प्रत्येकी 106 जागा लढवेल तर उर्वरित जागा मित्रपक्षांना देईल असं ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत तर एमआयएमने वंचितशी फारकत घेत 3 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे.