मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर चर्चेत असलेल्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरणारे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा सुद्धा विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून पराभव झाला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात जातीयसमीकरणाचे चित्र फिरले आणि हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा मिळालेला पाठींबाचं त्यांना भोवला. त्यामुळे जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
हर्षवर्धन जाधव २००९ पासून सलग दोन वेळा कन्नड मतदारसंघातून निवडणून आले आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी आपले नशीब आजमावून पाहिले. तर याच निवडणुकीत मराठा फॅक्टरमुळे जाधवांनी दोन लाखाहून अधिक मते घेतली होती.यामुळे मतांचे विभाजन होऊन चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. जाधव यांच्यामुळेच जलील निवडून आल्याचे आरोप त्यांनतर शिवसेनेकडून करण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्यात जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधान आणि एमआयएमनी दिलेला खुला पाठींब्यानंतर कन्नड मतदारसंघातील राजकरण तापल्याचे पाहायला मिळाले होते. मतदानाच्या दिवशी कन्नड शहरातील मुस्लीम मतदार जाधवांना एकतर्फी मतदान करत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर, इतर मतदार बिथरल्याने आपसुकच 'ती' मते उदयसिंह राजपूत यांच्या पारड्यात गेली.
ऐनवेळी दिलेल्या एमआयएमच्या पाठिंब्याने कन्नड मतदारसंघातील जातीयसमीकरणांना महत्व आले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जाधवांच्या सोबत असलेला मराठा फॅक्टर यावेळी शिवसेनेच्या सोबत उभा राहिला. त्यातच उद्धव ठाकरेंबद्दल कलेल्या विधानामुळे जाधवांना पाडण्यासाठी शिवसेनेकडूनही मोठ्याप्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे सलग दोन वेळा निवडून आलेल्या हर्षवर्धन जाधवांना हॅटट्रिक करता आली नाही.