मुंबई : काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने सुरुंग लावला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून येणारे काशिराम पावरा यांनी यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली होती. तर पावरा यांनी हॅटट्रिक करत पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजयाची मालिका कायम ठेवली आहे. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या शिरपूरमध्ये आता भाजपचे कमळ फुलले असून, चेहरा मात्र तोच आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघ गेली 30 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात होता.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमरीश पटेल यांचे वर्चस्व आहे. पटेल हे १९९० पासून २००४ पर्यंत सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र २००९ ला हा मतदारसंघ राखीव झाल्याने काँग्रेसकडून काशिराम पावरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. आमदार पावरा यांनी विजयाची मालिका कायम ठेवत सलग दोन वेळा या मतदारसंघाच नेतृत्व केलं. मात्र शिरपूरात भाजपची वाढती ताकद लक्षात घेत पावरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या 20 दिवसाआधी भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचा गड कायम ठेवणारे पावरा भाजपमध्ये गेल्याने या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागे होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य देणाऱ्या शिरपूरकरांनी यावेळी भाजपचे उमेदवार काशिराम पावरा यान तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवले. पावरा यांनी १ लाख २० हजार ४०३ मते घेत अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा ४९ हजार १७४ मतांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या पावरा यांच्या विजयानंतर, पक्ष बदलणाऱ्या शिरपूरकरांनी उमेदवार कायम ठेवला असल्याची चर्चा आहे.
कुणाला किती मते मिळाली
काशिराम पावरा ( भाजपा ) - १ लाख २० हजार ४०३
रणजीतसिंग पावरा ( काँग्रेस ) - ७ हजार ७५४
जितेंद्र ठाकूर ( अपक्ष ) - ७१ हजार २२९
मोतीलाल सोनवणे ( वंचित बहुजन आघाडी ) - ३ हजार ५३४