विधानसभेला होणार लोकसभेची पुनरावृत्ती; वंचित-काँग्रेस युती फिसकटण्याची चिन्हे !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 06:22 PM2019-07-24T18:22:35+5:302019-07-24T18:23:02+5:30
लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे २ महिने शिल्लक राहिले असताना, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाच्या मुद्यावर अजूनही तोडगा निघू शकला नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा अटोकाट प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेली ४० जागांची ऑफर आणि वंचितच्या अटींमुळे ही युती फिसकटण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. विधानसभा निवडणुकीत वंचितला महाआघाडीत सामील करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे. मात्र काँग्रेसबरोबर युती करण्यावरून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागा देऊ असा प्रस्ताव ठेवला आहे. तर काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावत हे अत्यंत गंमतशीर असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ही युती फिसकटण्याची चर्चा सुरु आहे.
त्यातच आता काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर वंचित आघाडी या आघाडीत सहभागी होणार नसल्याची अट वंचितने घातिली असल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष समावेश होण्याची चिन्हं कठीण दिसत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लीम मतांची झालेली विभागणीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत पुन्हा पहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.