मुंबई - आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या छाननी समितीचे अध्यक्षपद मध्यप्रदेशचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच याची घोषणा केला. सिंधीया यांचा महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचा संबंध असून त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रकाँग्रेसला लाभ होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची निश्चित करण्याचे काम ही समिती करणार आहे. या समितीत सिंधीया यांच्या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन खर्गे, हरिष चौधरी, मणिक्कम टागोर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, तसेच आमदार के.सी. पडवी यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढविण्यासंदर्भात समिकतीचे मत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भातील निर्णयात सिंधीया यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जम्मू काश्मीरविषयी भाजप सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाला सिंधीया यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सिंधीया भाजपमध्ये येणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांची छाननी समितीवरील नियुक्त महत्त्वपूर्ण मानली जात आहे.