मुंबई - विरोधी पक्षातील आमदारांना निधीसाठी डावललं जात आहे असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी संतप्त भूमिका मांडत अर्थमंत्री अजित पवारांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निधी वाटपाबाबत मी उदाहरण आहे. मी अर्थमंत्र्यांना ५० पत्र पाठवली, ५० फोन त्यांच्या स्वीय सहाय्यकांना केले. मात्र अर्थमंत्री तुम्हाला भेटायला तयार नाहीत असं त्यांनी सांगितलं. निधीसाठी जावं लागतं, मतदारसंघासाठी निधी मागावा लागतो. मला ते बंगल्यातही प्रवेश देणार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांकडे सांगितले त्यांनी मी बघतो असं म्हटलंय. आता विठोबा रुखमाई पावली तर निधी मिळेल असं त्यांनी सांगितले.
तसेच मला एक रूपयाही निधी नाही. हे कुठे असतं का? आमच्याकडे नागरिक नाहीत का? फक्त तुमच्या ओळखीच्या मतदारसंघाकडे नागरिक आहेत का? आमच्या इथंही साडेतीन चार लाख नागरीक आहेत. त्यांना काहीतरी द्या. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना द्या पण आमदारांना अगदीच कटोरा घेऊन भीक मागायला लावू नका. तो आमदार आहेत. उद्या हे सरकार गेले तर तुम्हीही फक्त आमदार राहणार आहात असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लगावला.
दरम्यान, विठोबा रुखमाईला वेगळं करणे हे महाराष्ट्राच्या ध्यानीमनी स्वप्नी नाही. मात्र या सरकारने केवळ विठोबाची पूजा केली रुखमाई कुठे दिसली नाही. पुरुषप्रधान संस्कृतीवर या सरकारचा किती पगडा आहे हे दिसून येते. पुरुषप्रधान संस्कृतीचा विचार हा मनुस्मृतीतून येतो. त्यात महिलांना कुठेही स्थान नाही. तसे रुखमाईला कुठेही स्थान या सरकारने दिले नाही. त्यामुळे मनुस्मृती या सरकारच्या विचारात किती बसलीय हे स्पष्ट होते असा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केला.
शिक्षणमंत्र्यांवरही हल्लाबोल
मनुस्मृतीतील ४ श्लोक चांगले, त्यातून घेणार हे शिक्षणमंत्र्यांनीच सांगितले होते. ते अजूनही त्यावर हो की नाही बोलत नाही. उच्च नीच कोण हे सांगणारा मनु, शुद्रांना जीवन नकोसे करणारा मनु, क्षत्रियांचा स्वाभिमान हिरावून घेणारा मनु, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आम्ही करणार नाही याचा जन्म मनुस्मृतीतून झाला. तीच मनुस्मृती हे सरकार परत आणणंय त्यामुळे याला महाराष्ट्रात विरोध केलाच पाहिजे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले