मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली, राज्यातील काँग्रेसमध्ये नेतृत्वात बदल करण्याची भूमिका नेतृत्वाची आहे असं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहे. या प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची निवड करण्यात येईल तर रिक्त होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि अभ्यासू नेते पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदात कोणता रस नाही, भाजपातून काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचं आश्वासन मिळालं होतं. येणाऱ्या काळात राज्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याची पक्षाला गरज पडणार आहे. त्यासाठी नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी दिल्लीत गळ घातली आहे.
दिल्लीत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा महत्त्वाचा नेता सरकारच्या बाहेर राहणे हे पक्षासाठी चांगले नव्हते, त्यासाठी संघटनात्मक दृष्टीतून पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्ष पद देऊन नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येऊ शकतं. राज्यात आमचा सरकारला पाठिंबा आहे पण डिसिजन मेकर नाही असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यात सरकारमधील काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
मिळेल ती जबाबदारी पार पाडू
काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, पक्षाने विधानसभेचे अध्यक्षपद दिलं ते स्वीकारलं, प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर तेही काम करुन दाखवू, प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल असं मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. तर विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत कुठलीही चर्चा माझ्याशी झालेली नाही, पण पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे.