पालघर - पायाखालची जमीन सरकल्याने, विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य विरोधक करत आहेत. मात्र सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्य सरकार बरखास्त करून लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल औरंगाबाद येथे केले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, चव्हाणांचे विधान चुकीचे असून त्यांना भविष्य वर्तवण्याची सवय लागली आहे. पालघर येथील नूतनीकरण केलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर, त्यांनी भूकंपाबाबत आढावा बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते.हे सरकार विकासाचे अनेक निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्रमात सांगितले. नीलक्रांती व सागरमाला योजनेंतर्गत मासेमारी व्यवसायाला मोठी मदत होणार असून, ४० विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे ते म्हणाले; तसेच राज्य शासनाने पाठविलेले सर्व प्रस्ताव केंद्राने मान्य केले असून, किनाऱ्यावर जेट्टी उभारण्यासाठी १७३ कोटी तर फिशिंग हार्बर व १२ प्रस्तावित जेट्टीसाठी २४० कोटी रुपये दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
विधानसभा बरखास्त होणार नाही - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:43 AM