शिंदे साहेब, नवीन वर्षात 'हा' एक निर्णय घ्या; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले अनुभवाचे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:49 PM2022-12-30T17:49:52+5:302022-12-30T17:50:28+5:30
Assembly Winter Session: ''झालं गेलं गंगेला मिळालं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही.''
Assembly Winter Session: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. त्यांनी ठाकरे गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकांचा खरपून समाचार घेतला. यानंतर विरीध पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी पवारांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली. तसेच, नवीन वर्षात एक निर्णय घेण्याची विनंती केली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ''शरद पवारांनीही 78 साली पुलोद स्थापन केलं होतं...हशु अडवाणी, उत्तमराव पाटील त्या मंत्रिमंडळात होते... कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं राजकीय होत नाही. एखाद दुसरा चिमटा काढला समजू शकतो...बाहेर ज्यांना सोडून आला, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार, ते तुम्ही मनाला लावून घेणार आणि ते तुम्ही इथे सांगणार...आम्हाला काय देणंघेणं आहे त्याचं.''
मुलं आहेत म्हणून सोडून द्या
''मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्याच्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालंय. तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झालाय. असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही. मला काम कसं मिळेल, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काय भूमिका घेतली जाणार, याकडे त्यांचं लक्ष. तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय. जाऊ द्या. मुलं आहेत म्हणून सोडून द्या. दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा.''
प्रवक्त्यांना आता जबाबदारी द्या
''मागच्या काळामध्ये झालं.. झालं गेलं गंगेला मिळालं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही...तेच तेच सांगत बसण्यापेक्षा
नवीन वर्षं 2023 सुरू होतंय. राज्याचे प्रमुख या नात्याने निर्णय घ्या. कुणी काही बोलत असतील, तर ते माझे प्रवक्ते बघतील. दीपक केसरकर आहेत ना वस्ताद बोलायला, ते आठी पडू देत नाहीत, हसत नाहीत, रडत नाहीत. शांतपणे उत्तर देत असतात. जिथे खोच मारायची तिथे बरोब्बर मारतो. अशी चांगली आम्ही तयार केलेली माणसं तुम्ही घेतली आहेत, त्यांच्यावर जबाबदारी द्या,'' असा चिमटा अजित पवारांनी काढला.
महाराष्ट्राची एक संस्कृती आहे
''राज्याच्या 13 कोटी जनतेचे प्रमुख आहात. मुख्यमंत्री आहात. देशाच्या राजकारणात दोन नंबरचं पद महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा. ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्याची जबाबदारी शिंदे साहेब तुमच्यावर आहे. पुन्हा विचार करा. आपण आपलं चालत राहायचं, बोलणारे बोलत असतात. जनता व्यवस्थित समजून घेते,'' असेही पवार म्हणाले.