"म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला..." CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:14 PM2022-12-30T17:14:09+5:302022-12-30T17:28:34+5:30
Assembly Winter Session: आज अधिवेशनाचा अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
Assembly Winter Session: आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वेगळ्या शैलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ''हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा. अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदललं,'' असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
तर नागपूरमध्ये अधिवेशन झालं नसतं...
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ''आमच्या सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्या, त्याचं विरोधकांनी कौतुक करायला हवं होतं. आज जापान-चीनमध्ये कोरोना आहे. सरकार बदललं नसतं, तर इथे अधिवेशन झालंच नसतं. गेल्या अडीच वर्षात करोनाच्या स्थितीत राज्य नैराश्याच्या गर्तेत होतं. आम्ही आल्यानंतर राज्याला चालना देण्याचे काम केले. शेतकऱ्यांना काय पाहिजे आम्हाला कळलं आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.''
50 जण कसे चुकतील?
''आमचे सरकार आल्यानंतर दहीहंडी जल्लोषात झाली, गणेशोत्सव जोशात साजरा केला. लोकं बाहेर पडले त्याचा लोकांना आनंद झाला. अजितदादा तुम्ही काल म्हणालात की मी चुकलो. जो माणूस चूक सुधारतो तो आत्मक्लेश करतो. मात्र काही लोक चुकले तरी आम्हीच बरोबर म्हणतात. एक माणूस चुकतो, दोन चुकतात, पाच चुकतात, दहा चुकू शकतात, पण 50 जण कसे चुकतील. तरीही एक माणूस म्हणतो पन्नास लोक चुकीचे आणि मीच बरोबर,'' असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.