मुंबई : शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन आणि परिणाम यांच्या बळकटीकरणासाठी राज्यात लवकरच राज्य मूल्यमापन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पद्धती अद्ययावत करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राज्य मूल्यमापन कक्षाची स्थापना पुणे येथे करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला.
मूल्यमापन कार्यपद्धती, मूल्यमापनाशी निगडीत शिक्षकांची प्रशिक्षणे, विविध प्रकारच्या चाचण्या व सर्वेक्षणांचे आयोजन, तसेच मूल्यमापनासंबंधी अनुषंगिक बाबी इत्यादीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण या केंद्र पुरस्कृत प्रकल्पांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथील मूल्यमापन विभागांतर्गत मूल्यमापन कक्षाची स्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
कक्षाची उद्दिष्ट्ये काय ?राज्यातील अध्ययन स्तरांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये राज्याला शैक्षणिक आणि तांत्रिक साह्य प्रदान करणे. अध्ययन मूल्यमापनाचा अभ्यास करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावरील विविध भाग धारकांमध्ये क्षमता निर्माण करणे. मूल्यमापन पद्धतीमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करणे, इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपेढी निर्मिती करणे. विद्यार्थी संपादणुकीचे सातत्यपूर्ण मूल्यांकन करून गुणवत्ता समृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना करणे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करणे, सहाध्यायी मूल्यांकन वर्ग मूल्यांकन, साप्ताहिक परीक्षा घेणे. मासिक प्रगती अहवाल निर्मिती इ. वर लक्ष केंद्रित करणे. शाळा आधारित मूल्यमापनासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन करणे. राज्याच्या शालेय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय निकषांच्या आधारे सुधारणा करणे.
कोणाच्या अधिपत्याखाली?राज्य मूल्यमापन कक्ष हा संपूर्णपणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिपत्याखाली कार्यरत राहील. त्यानुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमधील मूल्यमापन विभागाच्या समन्वयाने राज्य मूल्यमापन कक्ष काम करेल. राज्य मूल्यमापन कक्षाच्या कामकाजासाठी आवश्यक मंजूर निधी स्टार्स प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांना उपलब्ध करून देण्यात येईल. समग्र शिक्षा अंतर्गतदेखील राज्य मूल्यमापन कक्षाकरिता तरतूद करण्यात आली आहे.