मुंबई : २०१९च्या निवडणुकीत आचारसंहिता लागू होणे ते मतदानापर्यंतच्या काळात जेवढ्या रकमेची मालमत्ता पोलिस व इतर यंत्रणांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जप्त केली होती तो आकडा यावेळी मतदानाला २२ दिवस शिल्लक असताना दुपटीहून अधिक झाला.
गेल्यावेळी पूर्ण निवडणूक काळात १२२ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, हा आकडा यावेळी आताच ३४५ कोटींवर गेला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या महाराष्ट्र आणि झारखंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यात ही माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला दोन्ही राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक उपस्थित होते. या बैठकीला राज्याच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
राजीव कुमार यांनी या बैठकीत महाराष्ट्रातील वाढत्या राजकीय हिंसक घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. निवडणुकीचे वातावरण बिघडविणाऱ्यांविरूद्ध कठोर पावले उचला, असे आदेश राजीव कुमार यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले. कोणाचीही गय करू नका, असे त्यांनी बजावले.
कुठून येतोय पैसा?निवडणुकीतील पैसा, दारूचा गैरवापर, सोने - चांदीसह मौल्यवान वस्तूंचे होणारे वाटप असे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून ३४५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील १७५ कोटींच्या मालमत्ता आहेत. निवडणूक होत असलेल्या राज्यांना लागून असलेल्या राज्यांमधून बरेचदा मोठ्या प्रमाणात निवडणुकीत वापरण्यासाठी पैसा येत असतो. तसेच अवैध दारूही मोठ्या प्रमाणात आणली जाते. सीमावर्ती नाक्यांवर पोलिसांची गस्त वाढवा, असेही आदेश राजीव कुमार यांनी दिले.