ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीला प्रोत्साहन देतना नेत्यांच्या मुला-मुलींना तिकीटे दिली आहेत. पहिल्यांदा निवडणुकीच्या अखाडयात उतरलेली नेत्यांची ही मुले कोटयावधीच्या संपत्तीची धनी आहेत. दादरमधील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधन सरवणकरने 9.4 कोटीची संपत्ती जाहीर केली आहे. 31 वर्षाच्या समाधानचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले असून, तो माहिमच्या 194 प्रभागातून निवडणूक लढवत आहे.
भाजपा आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश दक्षिण मुंबईतील 221 प्रभागातून निवडणूक लढवत आहे. त्याने 7.5 कोटीची संपत्ती जाहीर केली आहे. 34 वर्षीय आकाश पदवीधर असून, राजस्थान जालोरमध्ये त्याच्यानावे शेतजमीन आहे. मुंबईत मरीन ड्राईव्ह आणि सूरत अशी दोन ठिकाणी मालकी हक्काची घरे आहेत.
महिला, बाल कल्याण खात्याच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर भाजपाच्या तिकीटावर गोरेगावच्या वॉर्ड नंबर 50 मधून निवडणूक लढवत आहे. त्याने प्रतिज्ञापत्रात 2.1 कोटीची संपत्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मुलगी साना कुर्ल्याच्या 165 प्रभागातून निवडणूक लढवत आहे. प्रतिज्ञापत्रातून तिने 5.1 कोटीची संपत्ती जाहीर केली आहे.