नाशिक : शिक्षण उपसंचालक कार्यालयात २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती न झाल्यामुळे, अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात पहिली ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाबाबत शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे, शैक्षणिक समन्वयक, संच, शाळा व शिक्षक मान्यता देणे, तसेच अध्यापक विद्यालयांची कार्यवाही करणे आदी कामकाज चालते. संगणकीय, तसेच न्यायालयीन आणि इतर कामांचाही मोठा ताण कर्मचाऱ्यांवर असतो. मात्र, कमी मनुष्यबळावरच येथील कामकाज करावे लागते. कामाचा ताण कमी करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या करारावर घेतले जाणार आहे. अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे कामकाज सुलभ होईल. संगणकीय ज्ञान असलेल्या ६५ वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त वर्ग-२च्या अधिकाऱ्यांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार, अनेक अर्ज आले आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत
By admin | Published: April 03, 2017 5:33 AM