उल्हासनगर : अतिक्रमण तोडताना दुकानाचा भाग अर्धवट तोडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी ही दुर्घटना घडली होती. त्यात बळी गेल्याच्या मुद्द्यावरून सतर्क नागरिकांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकायुक्ताकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर महापालिकेने अंबरनाथ- कल्याण महामार्ग १०० फुटी करण्यासाठी अतिक्रमणे तोडून त्याचे रुंदीकरण केले. शिवाजी चौकाजवळील टिल्सन मार्केट येथील दुकानावर प्रभाग अधिकारी व सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली. त्यातील अर्धवट तोडलेल्या दुकानाचा धोकादायक भाग कोसळून दुर्घटना घडू शकते, असे शेजारच्या दुकानदारासह नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना सुचवले होते. पण, त्या अर्धवट तोडलेल्या बांधकामाचा भाग तोडण्यात आला नाही. १९ जुलैला रवींद्र पाल (वय ४०) स्कूटरवरून या अर्धवट तुटलेल्या दुकानाखालून जात असताना अचानक धोकादायक भाग त्यांच्या अंगावर कोसळला आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पालिकेवर टीकेची झोड उठली. धोका लक्षात आणून दिल्यानंतरही तोडलेले बांधकाम अर्धवट स्थितीत ठेवल्याबद्दल आणि त्यामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत महापालिकेचे सहायक आयुक्त गोवारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पाल यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार न धरता फक्त गोवारी आणि शासकीय कर्मचारी दीपक रोहिदास भोई यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरही खऱ्या गुन्हेगारांना वाचवल्याबद्दल पालिकेवर टीका सुरू आहे. रस्ता रुंदीकरणात आपले हक्काचे दुकान जाते, म्हणून काही दुकानदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. (प्रतिनिधी)>शहाड - पालिका रस्त्याचे कामही वादग्रस्तया मृत्यू प्रकरणाने अंबरनाथ-कल्याण रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापालिकेने चूक सुधारण्यासाठी पाल यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई दिली आहे. त्यानंतरही रस्त्याच्या बाजूला असलेली अर्धवट तुटलेली दुकाने जमीनदोस्त करण्याची मागणी होत आहे. पालिकेचे सहायक आयुक्त गोवारी यांच्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी त्याच प्रमाणात दोषी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी याचिकाकर्ते पुन्हा लोकायुक्तांचा दरवाजा ठोठावणार आहेत. अंबरनाथ-कल्याण रस्त्याप्रमाणे शहाड स्टेशन ते महापालिका रस्त्याचे कामही वादग्रस्त ठरले. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सहा जणांचा बळी गेल्याचा आरोप महासभेत झाला होता. त्यांच्या कुटुंंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी मध्यंतरी झाली आहे. आजही काही दुकाने रस्त्याच्या बाजूला अर्धवट तुटलेल्या स्थितीत असून त्याबाबत काहीच निर्णय लागत नसल्याने दीड वर्षापासून अंबरनाथ-कल्याण रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
सहायक आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा
By admin | Published: March 07, 2017 3:11 AM