मुंबई : बेकायदा बांधकामाला संरक्षण दिल्याप्रकरणी एन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी निलंबित केल्याने अन्य साहाय्यक आयुक्तांचे धाबे दणणाले आहेत. कारवाईचा इशारा आयुक्तांनी खरा करून दाखविल्यामुळे सर्व सहाय्यक आयुक्त आता कामाला लागले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात परळ, कांदिवली, अंधेरी या भागांमध्ये बेकायदा बांधकाम व फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती.बेकायदा बांधकाम न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, अशी ताकीदच काही महिन्यांपूर्वी आयुक्तांनी दिली होती. तरीहीवारंवार इशारा देऊनही एन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशू द्विवेदी यांनी घाटकोपरमधील बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले, असा ठपका आहे. वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या या अधिकाऱ्याला अखेर आयुक्तांनी घरी बसवले आहे.पुढच्यास ठेच, मागचे शहाणे, असे चित्र आज पालिकेत बघायला मिळाले. आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या इतर सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम उघडली. त्यामुळे रामनवमीनिमित्त पालिका कार्यालय बंद असूनही अधिकारी रस्त्यावर होते. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याने सहाय्यक आयुक्तांची झोप उडाल्याचे समजते. (प्रतिनिधी)परळ, एलफिन्स्टन हा परिसर फेरीवाल्यांनी गजबजलेला. मात्र आज या रस्त्यावर पालिकेचे पथक उतरून धडक कारवाई करताना दिसले. त्यानुसार ५० झोपड्या आणि ३२ फेरीवाल्यांना हटविण्यात आले. आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्स हायवे उड्डाणपूल येथील ५० झोपड्या जमीनदोस्त केल्या. तसेच लोखंडवाला संकुल परिसरातील पदपथावर असलेल्या ३२ फेरीवाल्यांना समतानगर पोलीस ठाण्यातील फौजफाट्याच्या मदतीने हटविण्यात आले.के पश्चिम विभागांतर्गत अंधेरी येथील नारायण चव्हाण मार्गावरील पक्के बेकायदा बांधकाम, भवन्स कॉलेज गेट नं. ४ येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच डी.एन. नगर अष्टविनायक इमारतीसमोरील आठ स्टॉल्स हटविण्यात आले.बेकायदा बांधकामांना अभय दिल्याप्रकरणी पूर्व आणि पश्चिम येथील दोन साहाय्यक आयुक्तांवरही कारवाईचे संकेत आहेत.
सहाय्यक आयुक्तांचे धाबे दणाणले!
By admin | Published: April 05, 2017 6:09 AM