अकोला: बँकेत गहाण असलेल्या प्लॉटवर बोजा चढवायला आवश्यक असलेल्या खतावणी प्रमाणपत्रासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या सहायक उपनिबंधक सुनंदा चिंतामण मोरे हिच्या दुर्गा चौकातील आणि पुण्यातील घरांची एसीबीने मंगळवारी झडती घेतली. झडतीदरम्यान मोरे हिच्या दुर्गा चौकातील घरामध्ये एकूण ३३ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुय्यम उपनिबंधक कार्यालयात कार्यरत सहायक उपनिबंधक सुनंदा मोरे हिला एका तक्रारदाराकडून सोमवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास १ हजार रुपयांची, तर तिचे सहकारी हिंमत सुदाम शिराळे, आशीष शालिकराम पिंजरकर यांनी २00 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी सायंकाळी अटक केली होती. मंगळवारी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी मोरे हिच्या दुर्गा चौकातील मुक्तागिरी निवासस्थान आणि पुण्यातील निवासस्थानाची झडती घेतली. झडतीदरम्यान दुर्गा चौकातील निवासस्थानी एसीबी अधिकार्यांना १ लाख रुपयांची रोकड, जळगाव येथील पतसंस्थेत फिक्स डिपॉझिटचे १९ लाख रुपये व बँकेतील बचत खात्यात १३ लाख अशी एकूण ३३ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मिळून आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यातील निवासस्थानामध्ये सुरू असलेल्या झडतीमध्ये चल-अचल संपत्तीची माहिती घेण्याचे काम पुणे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भट करीत होते, अशी माहिती उत्तमराव जाधव यांनी दिली.
सहायक उपनिबंधकाकडे ३३ लाखांची बेहिशोबी मालमत्ता
By admin | Published: October 01, 2014 1:20 AM