अकोला : शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करून समाधान करण्यापेक्षा शेतीला कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर राज्य शासनाने भर दिला असून, मूल्यवर्धित शेती विकासासाठी गुंतवूणक वाढविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोटेक-२०१५’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर मोठी संकटे निर्माण झाली असून, उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील ६० वर्षांत आपण निश्चित धोरण आखू शकलो नाही. त्यामुळे त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहोत.प्रक्रिया उद्योगाची वाढ करण्यासाठी वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातून सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठाने सीडलेस संत्रा संशोधन केले आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शीतपेय व इरिगेशन कंपनीसोबत करार केला आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी पूर्व विदर्भात प्रकल्प उभारणार आहोत. कृषिपंपांचा अनुशेष मार्च २०१६पर्यंत निकाली काढला जाईल. वीज बचतीसाठीचे आधुनिक कृषिपंप उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना व्यवस्थेने कसे दुर्लक्ष केले, यावर विवेचन केले. (प्रतिनिधी)
शेतीला स्थैर्य देण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याचे आश्वासन
By admin | Published: December 28, 2015 4:03 AM