पुणे : ज्योतिषशास्त्र हे कालविधान शास्त्र आहे. पर्यावरणशास्त्रात निसर्गातील आडाखे बांधता येतात त्याप्रमाणे ज्योतिषाला एक वेगळी दृष्टी आहे. शास्त्रजिज्ञासेतून जन्माला येते त्यातून ज्ञानाची अनुभूती येते. जाणीव जेव्हा व्यापक पातळीवर जाणवते तेव्हा अनुभूतीचे महत्त्व समजते आणि यासाठीच ज्योतिषांनी आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. पं. दादासाहेब जकातदार प्रतिष्ठानतर्फे कै. श्रीकृष्ण जकातदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी मंदाश्री पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ््यात ते बोलत होते. या वेळी ज्योतिष अध्यापक विलास गोपाळ देव आणि पारंपरिक व कृष्णमूर्ती ज्योतिष अभ्यासक डॉ. राजश्री पाठक यांना ‘मंदाश्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा शाहू मोडक, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. वा. ल. मंजूळ, प्रतिष्ठानचे विश्वस्त विजय जकातदार व नंदकिशोर जकातदार उपस्थित होते. डॉ. देखणे म्हणाले, ‘‘ज्योतिषातील उदासीनता शास्त्राच्या माध्यमातून घालवता येते. ज्योतिषाने नैतिकता पाळली तरच त्यालाच नैतिक अधिकार प्राप्त होतो. सामान्य माणूस परिपूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्ह नको त्यापुढे स्वल्पविराम दिल्यास जीवन जगता येते.’’पल्लवी चौहान यांनी सूत्रसंचालन केले. विजय जकातदार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
ज्योतिषांनी आचारसंहिता पाळावी
By admin | Published: February 08, 2017 3:25 AM