नाशिक : दीड दशकानंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथालेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. महामंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांच्या नावाला बहुमताने पसंती देण्यात आली. महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. तेव्हापासूनच डॉ. नारळीकर यांच्या नावाची चर्चा होऊन रविवारी त्यावर मोहोर उमटवण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केले. तिन्ही दिवस उपस्थिती डॉ. नारळीकर हे तिन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार असून त्यांचे संमतीपत्र महामंडळाला प्राप्त झाले आहे. संमेलनाचे उद्घाटन राजकीय क्षेत्रातील मान्यवरांपेक्षा एखाद्या मोठ्या लेखकाच्याच हस्ते केले जाणार असल्याचे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.
२६ मार्चला संमेलनाची सुरुवात यंदाचे साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणार असून रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ ते २८ मार्च या काळात संमेलन होईल, असे ठाले पाटील यांनी सांगितले. २६ मार्चला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होईल.
किर्लोस्करांचे ते भाकीत खरे ठरले!‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लोस्कर’ मासिकात माझी कथा छापून आली होती; तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल; तेव्हा मी म्हणालो की, ‘मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. साहित्यातील माझा अनुभव कमी आहेे.’ पण आज किर्लोस्करांचे ते भाकीत खरे ठरले.