"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 01:54 PM2024-09-25T13:54:15+5:302024-09-25T13:58:18+5:30
Akshay Shinde encounter Court Hearing: अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरून अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. यावर तातडीची सुनावणी सुरु झाली आहे.
बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरून अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. शिंदे यांनी तातडीने फौजदारी रिट याचिका दाखल केली असून यावर तातडीने आज सुनावणी घेण्यात आली आहे. यामध्ये उच्च न्यायालयाने पहिल्या नजरेतच गडबड दिसतेय, अशी टिप्पणी केली आहे.
अण्णा शिंदे यांच्याकडून वकील अमित कटारनवरे काम पाहत आहेत. यावेळी न्यायालयात शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणूक असल्याने त्याचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी वकिलामार्फत केला आहे. माझ्या मुलाची पिस्तुल हिसकावण्याची हिंमत नाही, असेही ते म्हणाले आहेत.
याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज सोशल मीडिया, बॅनरद्वारे फिरू लागले आहेत. मग न्यायव्यवस्थेची गरजच काय असा सवाल याचिकाकर्त्या शिंदेंनी केला आहे.
न्यायालयाने काय म्हटले...
न्यायमूर्ती चव्हाण यांच्या बेंचसमोर ही सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मागे चार पोलीस होते, मग एका दुबळ्या व्यक्तीला ते ताब्यात ठेऊ शकले नाहीत हे कसे शक्य आहे. ते देखील गाडीच्या मागील भागात आरोपीच्या बाजुला दोन आणि पुढे दोन पोलीस होते. पिस्तुलवर हाताचे ठसे असायला हवेत आणि हात धुतलेला असायला हवा. पुढच्या तारखेला सर्वकाही सादर करा, असे न्यायालयाने म्हटले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार शिंदे याने तीन गोळ्या झाडल्या. पण एकच गोळी लागली. उरलेल्या दोन गोळ्या कुठे गेल्या? त्याने केलेला गोळीबार थेट पोलिसांवर होता की इकडे तिकडे केलेला, पोलिसाला कोणती दुखापत झाली आहे, छेद देऊन जाणारी की स्पर्श करून जाणारी, असा सवाल न्यायामूर्तींनी पोलिसांना केला आहे.