मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
"बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी अपघातामध्ये मरण पावले आहेत", असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे."
दरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.