मुंबई - ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अवकाशात २ महत्वाच्या सुंदर घडामोडी घडणार आहेत. २७-२८ ऑगस्टला अवकाशात दिसणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असून तो मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. तर ३१ ऑगस्ट रोजी रात्रीची पौर्णिमा ही सुपरमून आणि ब्लू मून पोर्णिमा असेल. या रात्रीसुद्धा चंद्र मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाँच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
दरवर्षी ३७८ दिवसानंतर शनी ग्रह पृथ्वीच्या कमी-अधिक जवळ येत असतो. ह्याला अपोझीशन (Apposition )असं म्हणतात म्हणजे पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य तर विरोधी बाजूला शनी असतो. शनी दर २९.५ वर्षाने सूर्याची एक प्रदक्षिणा करीत असतो. ह्या दरम्यान शनी आणि पृथ्वीच्या अंतरात बदल होत असतो. मागील वर्षी १४ ऑगस्ट आणि ह्या वर्षी २७ ऑगस्ट तर पुढील वर्षी शनी ८ सप्टेंबरला जवळ असेल. येत्या २७ ऑगस्ट रोजी शनी ग्रह कुंभ(Aquarius) राशीत दिसणार असून तो आकाराने मोठा आणि ०.४ प्रतीच्या (Magnitude) तेजस्वीतेचा दिसेल. शनीचे त्यावेळेसचे अंतर ८.७६ अँष्ट्रोनोमिकॅल युनिट (AU) किंवा १.२ बिल्लीयन कि.मी असेल.
शनीला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासत नाही तो साध्या डोळ्याने देखील तेजस्वी दिसतो परंतु शनीची कडी पहायची असेल तर मोठी द्विनेत्री किंवा ३/४ इंचाची दुर्बिणीची गरज भासते. या वेळेस शनीची कडा ८.१ डिग्रीने झुकलेली दिसेल आणि सिलीगर इफेक्ट पहावयास मिळेल. शनी सुर्यास्तानंतर पूर्वेला उगविताना दिसेल त्याची तेजस्विता क्षितिजावर आल्यानंतर वाढत जाईल. जरी तो एक आठवडा प्रखर तेजस्वी दिसणार असला तरी शनी ग्रहाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्वेला पाहता येईल.
सिलीगर इफेक्ट ( Seelinger effect) म्हणजे काय ?
शनी पुथ्वीवरून अगदी सरळ रेषेत दिसत असल्याने आणि सूर्य अगदी मागे असतो. शनिवरील वायूचे वातावरण आणि शनीच्या कडीवर असलेले हिमकण अगदी चकाकतात ह्यालाच सिलीगर इफेक्ट असे म्हणतात. हा इफेक्ट फक्त शनीच्या अपोझीशन वेळेसच दिसतो. सर्व खगोल प्रेमींनी साध्या डोळ्याने, द्विनेत्री किंवा दुर्बिणीने शनीला जरूर पाहावं असं आवाहन स्काय वॉच ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.
३१ ऑगस्टला ब्लू मून - सुपरमून
दर महिन्याला पोर्णिमा असते तेव्हा देखील चंद्र बिंब मोठे आणि तेजस्वी दिसतेच, परंतु अशा पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा मात्र चंद्रबिंब आणि प्रकाश सर्वसाधारण पौर्णिमेपेक्षा ७ % तर मायक्रोमून (Micromoon) पेक्षा १४ % जास्त मोठा दिसतो. चंद्र अंडाकार मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करताना वर्षातून दोन वेळा जवळ येतो परंतु दरवर्षी ३ सुपरमून होतात.
नियमाप्रमाणे चंद्र-पृथ्वीचे अंतर जेव्हा ३६०,००० किमी पेक्षा कमी असले पाहिजे. ह्या पौर्णिमेला चंद्र-पृथ्वी अंतर ३५७,००० किमी असेल. (चंद्र जेव्हा दूर असतो तेव्हा चंद्र-पृथ्वीचे अंतर ४०५,००० किमी असते तेव्हा चंद्र आकाराने लहान दिसतो त्याला मायक्रो मून म्हणतात) जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ असताना पौणिमा होते त्याला सुपरमून असे म्हणतात. परंतु ऑगस्ट महिन्यात दर दोन वर्षातून एकदा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात ( १ आणि ३१ ऑगस्ट) तेव्हा त्या दुसऱ्या पोर्णिमेला ब्लू मून असे संबोधतात. यातील ब्लू शब्दाचा आणि चंद्राचा काहीही सबंध नाही, चंद्र निळा दिसणार नाही. पुढील सुपरमून हा १८ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर २०२४ रोजी होईल. ३१ ऑगस्ट रोजी होणारी पौर्णिमा पावसाच्या किंवा ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी दिसण्याची शक्यता नसली तरी अनेक ठिकानी ती अल्प किंवा पूर्ण दिसण्याची शक्यता आहे. पोर्णिमेचा चंद्र दुर्बिणीने चांगला दिसत नाही, त्याला सरळ डोळ्याने पाहणे योग्य असते. २७ आणि ३१ ऑगस्ट रोजी अवकाशात घडणाऱ्या या घटना खगोलप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.