मुंबई - राज्यातील सत्तानाट्याला १ वर्ष पूर्ण होत असताना २० जूनला गद्दार दिन साजरा करावा अशी खोचक मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मागील वर्षी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताना शिवसेनेचे तत्कालीन नेते एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याची माहिती आहे. या बातमीनं राजकीय वर्तुळात भूकंप आला. शिंदेंसह आमदार गायब झाल्याने मविआ सरकारवर संकट कोसळले. आजही अनेक नेते ठाकरे गटाला सोडून शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांना खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता.
पक्षाला लागलेली गळती थांबणार कधी असं अवधुत गुप्ते यांनी खासदार संजय राऊतांना विचारले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्हाला या बंडाबाबत माहिती होते, एकनाथ शिंदेंसोबत फक्त ७-८ आमदार होते, बाकीचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी फोडले आहेत असा दावा त्यांनी केला. झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात संजय राऊतांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यात राऊतांनी हे विधान केले.
नारायण राणेंची खासदारकी जाऊ शकते...खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांना बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मीच खासदार केला होता. त्यावेळी मतदार यादीतही त्याचे नाव नव्हते असं त्यांनी म्हटलं. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी हे महाशय खोटे बोलत आहेत. त्यांनी माझा त्यावेळचा फॉर्म बघावा. माझं मतदारयादीतला नंबर पाहावा. नारायण राणे जे बोलतायेत त्यावरून त्यांचे केंद्रीय मंत्रिपद आणि खासदारकीही जाऊ शकते असं राऊतांनी म्हटलं.
कसं झालं बंड?राज्यात जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंसह काही आमदार नॉट रिचेबल झाले, त्यानंतर हे आमदार सूरतला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिंदेंसह आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्याचं चित्र समोर आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र पाठक हे शिंदेंशी बोलणी करायला गेले परंतु त्यांनाही यश आले नाही. त्यानंतर मुंबईतून एक एक करत तब्बल ४० आमदार सूरत व्हाया गुवाहाटी एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाले. त्यात ७ मंत्र्यांचाही समावेश होता.