मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गेल्या 66 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर सर्वांना सोबत घेऊन चालणारा सहिष्णू नेता हरपल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
अटल, अढळ, अचल, नित्य... - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल... ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगिण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरूषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे आहे. आमचे थोरनेते, राष्ट्रपुरूष श्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो, त्या आदर्शापैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरून समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
एक उमदं व्यक्तिमत्त्व गमावलं - शरद पवार भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे आपण एक उमदं व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्ता, प्रतिभासंपन्न कवी, आदर्श माणूस आणि सर्वोत्तम सांसद गमावला आहे. संसदेत त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केल्यानंतर आज अटलजींच्या निधनाने माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. वाजपेयीजींना भावपूर्ण श्रद्धांजली!
महान राजकारणी, दूरदर्शी विचारक गमावला - विजय दर्डाआपण एक महान राजकारणी, दूरदर्शी विचारक आणि शांततेचा संदेश घेऊन सत्याची ज्योत वाहून नेणारा राजकीय नेता गमावला आहे. ते पंतप्रधान आणि मी संसदेचा सदस्य असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. यवतमाळ येथील माझ्या घरी त्यांच्यासोबत झालेली भेट अतिशय स्मरणीय होती. त्यांच्या निधनानंतर, आम्ही देशाचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व व प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे. नि:संदेह सर्वोत्तम पंतप्रधानांंपैकी ते एक होते. त्यांनी कठीण परिस्थितीत देशाचे नेतृत्त्व केले, हे आमचे भाग्य आहे. देशवासीयांनी ज्यांना प्रेमाने अटलजी संबोधले होते, त्यांचे नेहमीच महान नेत्यांपैकी एक म्हणून स्मरण केले जाईल. त्यांनी नेहमीच राष्ट्राला स्वत:च्या आधी ठेवले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी श्रद्धांजली लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी वाहिली.
माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला - लता मंगेशकरअटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माझ्यासाठी अटलबिहारी वाजपेयी वडिलांसमान होते. त्यांनीही मला मुलगी मानले होते. त्यांच्या अतिशय साध्या व्यक्तिमत्वामुळे आमच्यात छान ऋणानुबंध निर्माण झाले होते. मला ते इतके प्रिय होते की मी त्यांना दादा म्हणून हाक मारायचे. आज मला इतकं दु:ख झालंय जितकं मला माझ्या वडिलाचं निधन झालं होतं तेव्हा झालं होतं. अतिशय तरल, हळवा कवीमनाच्या माणसाला आपण सगळ््यांनीच गमावलं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
आणखी एक भीष्म पितामह गमवला - उद्धव ठाकरे “अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमवला, पण ते सदैव आमच्या हृदयात राहतील.अटलजी अमर आहेत” अशी श्रद्धांजली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाहिली.
राजकारणातील तपस्वी व्यक्तिमत्व - विनोद तावडेआपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाची प्रगती साधणारे माजी पंतप्रधान, एक मुत्सद्दी राजकारणी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाने राजकारणातील एक तपस्वी व्यक्तिमत्व गमाविले, असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.
देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव - राज ठाकरेसाहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही माझ्या पिढीने ऐकली, अनुभवली, त्यांचं सुसंस्कृत राजकरण हे जवळून बघता आलं ह्याचा मला खरंच आनंद आहे. भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीकडे वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.
दिपस्तंभच आपल्यातून हरपला - गोपाळ शेट्टीदेशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे समजल्यावर मला तीव्र दुःख झाले. त्यांच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली असून एक दिपस्तंभच आपल्यातून हरपला आहे. त्यांच्या स्मृतीला मी व माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना विनम्र आदरांजली वाहत आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना.